माननीय न्यायमूर्ती संजीव खन्ना, भारताचे सरन्यायाधीश
(जन्मतारीख) : १४-०५-१९६०
पदाचा कालावधी : (नियुक्तीचा दिनांक) १८-०१-२०१९ ते (सेवानिवृत्तीचा दिनांक) १३-०५-२०२५
दिनांक १४ मे, १९६० रोजी जन्म झाला.
सन १९८३ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नावनोंदणी. सुरुवातीला, तीसहजारी संकुल, दिल्ली येथील जिल्हा न्यायालये येथे वकिली आणि नंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि न्यायाधिकरणे येथे घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष करआकारणी, लवाद कार्यवाही, वाणिज्यिक कायदा, कंपनी कायदा, जमिनीविषयक कायदा, पर्यावरणविषयक कायदा आणि वैद्यकीय हलगर्जीपणा अशा विविध क्षेत्रांत वकिली. आयकर विभागाकरिता वरिष्ठ स्थायी काउन्सेल म्हणून दीर्घकाळ काम केले. सन २००४ मध्ये, दिल्ली राजधानी प्रदेशाकरिता स्थायी काउन्सेल (दिवाणी) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयातील अनेक फौजदारी प्रकरणांत ते अतिरिक्त सरकारी वकील आणि न्यायमित्र म्हणूनसुद्धा उपस्थित राहिले आणि युक्तिवाद केला.
सन २००५ मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि सन २००६ मध्ये न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करीत असताना त्यांनी अध्यक्ष/प्रभारी न्यायमूर्ती, दिल्ली न्यायिक अकादमी, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आणि जिल्हा न्यायालय मध्यस्थी केंद्रे ही पदे भूषविली.
दिनांक १८ जानेवारी, २०१९ रोजी, त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्यात आली.
दिनांक १७ जून, २०२३ ते दिनांक २५ डिसेंबर, २०२३ या कालावधीत त्यांनी अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय विधी सेवा समिती हे पद भूषविले.
सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळ येथील नियामक काउन्सेलचे सदस्य आहेत.
दिनांक १३ मे, २०२५ रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत.